Ad will apear here
Next
ध्यास
भारतरत्न लता मंगेशकर यांचा नव्वदावा वाढदिवस नुकताच होऊन गेला. वयोमानानुसार येणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी सोडल्या तर त्यांचा उत्साह, त्यांची स्मृती, त्यांची विनोदबुद्धी, त्यांचा जगण्यातला रस अजून टिकून आहे. त्या घराच्या बाहेर पडू शकत नसतील; पण अजुनही घराच्या चार भिंतींच्या बाहेर काय चाललंय याच्यातला त्यांचा रस टिकून आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याच्या बाबतीत काय होतंय, देशात काय होतंय, संगीत विश्वात काय होतंय याची खडान् खडा माहिती त्यांना असते. त्यात रस घेऊन, पण अलिप्तता राखून त्या मजेत जगत असतात.

त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. वय वर्षे फक्त ९७. ‘दीदींच्या शंभराव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाषण करायला मला बोलवा. मी येईन’ हे म्हणण्याची जिगर आज ९७व्या वर्षीही टिकून असलेलं एक सदाबहार व्यक्तिमत्त्व.

परवा ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींचा नव्वदावा वाढदिवस पार पडला. त्यांचेही तेच. पायाने चालता येत नाही. पण आजही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचं वेड पूर्ण करतात. जाहिरातींमुळे त्यांना टीव्हीवर सिनेमा बघायला आवडत नाही. 

परवा प्रख्यात अभिनेते रमेश देव यांच्याशी बोलत होते. वय वर्षे ९२. आजही व्यायाम करतात. पोहायला जातात, पत्ते खेळायला क्लबमध्ये जातात. या वयातही १२ तास काम करतात!

प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे आज ८७व्या वर्षीही घरचं सगळं करण्यापासून ते संगीताचा, त्यांच्या गुरुकुलाचा व्याप सांभाळण्यापर्यंत सगळं तर करतातच; पण गाडीही चालवतात. रिव्हर्समध्ये वेगाने गाडी चालवणं ही त्यांची आवड. अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्या आजही हे करतात. 

प्रख्यात गायिका आशा भोसले. आज वयाची ८५ वर्षे ओलांडली तरी त्यांचा आवाज तर शाबूत आहेच; पण स्टेज शो करणं व गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असतानाही नाच करण्यापर्यंत सगळंच त्या आनंदाने करताना दिसतात.  

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण याही आज ८५ वर्षांच्या आहेत; पण पहाटे साडेचारला उठून पाणी भरण्यापासून घरी पापड कुरडया-मसाले करण्यापर्यंत आणि स्टेजवर गाण्यापर्यंत कशाच्याच आड त्यांचं वय येत नाही.

आज खरंच असे असंख्य दिग्गज आहेत, जे अगदी नव्वदी पार केल्यानंतरही सक्रिय आहेत. आपला आब राखून आहेत. आपल्या ज्ञानाचा समाजाला फायदा करून देताहेत आणि म्हातारपणाचा जणू अविभाज्य भाग बनलेली किरकिर न करता, उसासे न टाकता, मृत्यूची आळवणी न करता प्रत्येक क्षण आनंदाने जगताहेत.

वयोमानानुसार येणाऱ्या व्याधी त्यांनाही आहेत; मात्र त्या त्यांचं मनोबल खच्ची करू शकलेल्या नाहीत. त्यांचा कामाचा ध्यास कमी करू शकलेल्या नाहीत.

त्यांच्याकडे बघितलं, की प्रश्न पडतो की नंतरच्या पिढ्यांचं नेमकं कुठे चुकलंय? शिस्तबद्ध आचार-विचार -व्यवहार नाही हे तर त्याचं कारण नाही? का आपण जगण्याचा उत्साह गमावून बसतो आहोत? का आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाला वाटत असतं, की आपण वयाची पंच्याहत्तरीही बघणार नाही? 
आपण लढायच्या आधीच अर्जुनाप्रमाणे शस्त्रं तर टाकत नाहीय?

आपलं खरंच शरीर कमकुवत आहे की मन?

या प्रश्नांची उत्तरं कुणी शोधायची व त्याच्यावर उपाय कुणी करायचे? --- आपणच ना?

आपल्यापुढे आदर्श भरपूर आहेत. त्यांना अनुसरण्यासाठी मनाचे दरवाजे उघडणार कोण?—आपणच ना?
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZVNCG
Similar Posts
कणा... कुसुमाग्रजांच्या कवितेचा विविध बोलीभाषांत अनुवाद ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘विठ्ठल’ या कवितेचा मराठीच्या विविध बोलींमधला अनुवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे आता आणखी एक ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविताही व्हायरल झाली आहे, ती तिच्या विविध बोलींमधल्या अनुवादासह... ती कविता आणि अनुवाद येथे देत आहोत
ज्ञानवर्धक बोधकथा आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत. आपण त्यांच्या ताब्यात असलो, तर आपण ‘चोर’ आहोत. ते आपल्या ताब्यात असले तर आपण ‘राजा’ आहोत. निवड तुमची आहे.
वैशिष्ट्यपूर्ण मराठा तलवारी अभ्यासाअंती शिवाजी महाराजांच्या असे लक्षात आले, की मराठ्यांची शारीरिक ठेवण लहान आणि त्यांच्या तलवारीची लांबी कमी, यामुळे मराठा कितीही पराक्रमी असला तरी त्यांना मुघलांपुढे हार खावी लागत असे. महाराजांच्या दूरदर्शी बुद्धीला मराठ्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण दिसू लागले, ते म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पद्धतीने शस्त्र नसणे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language